शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सभागृहातील काळ्या मातीशी नाते सांगणारा प्रत्येक आमदार आग्रही होता. सुरुवातीला बी.जे.पी. चे आमदार देखिल आंदोलनात सामिल झाले. नंतर काय झाले माहित नाही. पण, आम्ही मात्र पहिल्या दिवसापासून जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही या भूमिकेवर ठाम होतो. आणि अर्थसंकल्पाचा दिवस उजाडला. अर्थसंकल्प मांडत असतानाही आम्ही कर्जमाफी द्या यासाठी सभागृहात घोषणा देत होतो आणि तो लोकशाही मधील आमचा अधिकार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील स्थिती भयावह आहे. गेल्या काही वर्षात हजारोने आत्महत्या झाल्या आहेत. हे सरकार आल्यापासून तर मागील अडीच वर्षात आत्महत्येने तर उच्चांक गाठला विदर्भातील, मराठवाड्यातील झाडावर एक-एक देह लटकताना उभ्या महाराष्ट्राने पाहिले. आया बहिणींच्या तुटलेल्या बांगड्या, त्यांचा आक्रोश, त्यांचे पुसलेले कुंकू, पोरा-बाळांची झालेली आबाळ, उध्वस्त झालेला संसार आम्हांला कसा काय शांत बसू देईल हे भयावह चित्र् समोर आल्यावर विधीमंडळात मी बोललो नाही तर माझ्या ह्रदयाचा बर्फ झाला आहे असेच मी समजेन.

ज्या कामासाठी मी या सभागृहात जातो, जे कर्तव्य बजावण्यासाठी लोकांनी मला सभागृहात पाठविले ते मी केले. माझ्या आया-बहिणींच्या अश्रूंमधल्या वेदना मी सभागृहात मांडल्या. शेतक-यांच्या आत्महत्येकडे दूर्लक्ष करणा-या सरकारने मात्र या लोकशाहीचीच हत्या केली आणि माझे आणि माझ्या 18 सहका-यांचे निलंबन झाले. उद्यापासून आम्ही विधीमंडळात दिसणार नाही. पण, म्हणून आमचा आवाज दाबला जाईल हा भ्रम चुकीचा आहे. पण, महाराष्ट्रामध्ये आजपासून एक नवीन चित्र निर्माण होईल. आणि हे सरकार शेतकरी विरोधी आहे माणूसकीचा चेहरा हरवून बसला आहे. यावर महाराष्ट्र शिक्कामोर्तब करेल.

झाडावरती लटकलेल्या देहाकडे बघत अश्रू ढाळणा-या माझ्या मातेसाठी जर माझे निलंबन झाले असेल तर मला ते मान्य आहे. सरकारला हा जर माझा गुन्हा वाटत असेल तर होय मी हा गुन्हा केला आहे. आणि जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत परत – परत करत राहीन.

सध्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे वर्णन हे मोजक्या शब्दांतच करायचे झाले तर “मस्त रहो मस्ती मे आग लगे बस्ती मे”. उभा महाराष्ट्र जळत असतांना सत्तेचा वापर ज्या मग्रूरीने केला गेला त्याला महाराष्ट्राची काळी माती कधीही माफ करणार नाही.

#कर्जमाफी #महाराष्ट्र #शेतकरी #आत्महत्या #शेतकरीआत्महत्या #आमदार #निलंबन #विधानसभा

-जितेंद्र आव्हाड