ये देश नारे पे नही, भाईचारे पे चलता है l

ये देश नारे पे नही, भाईचारे पे चलता है l

आता भारत माता की जय या विषयावर काहीजण सर्टिफिकेट वाटत आहेत. ये देश नारे पे नही भाईचारे पे चलता है । या गोष्टीचा विसर पडताना दिसत आहे.निवडणूका जवळ आल्या की असे काही विषय काढून या देशाचे वातावरण गढूळ करुन देशभक्त विरुद्ध देशद्रोही अशी लढाई जणूकाही भारतात सुरु झाली आहे असे चित्र निर्माण करायचे.कोणिही उठायच आणि म्हणायच की तिरंगा बदला त्या जागी भगवा झेंडा आणा, कोणी म्हणायच राष्ट्रगीत बंद करा. या अगोदर देखिल घर वापसी,लव जिहाद, गोमांस हे विषय रंगवले गेले आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे परिणाम भोगावे लागले. असे विषय असताना देखिल बिहारमध्ये व्हायचे तेच झाले आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला.

या देशामध्ये सर्वसमावेशक मानसिकता असलेले भारतीय अधिक आहेत. हे इथल्या चतुर राजकारण्यांना (सत्ताधा-यांना) समजू नये हे थोड आश्चर्यकारकच आहे. आज राज्यातील निवडणूका आल्या आहेत. आणि देशात परत देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटण्याची धांदल सुरु आहे. आणि त्यातूनच कहर म्हणजे जे भारत माता की जय म्हणणार नाही त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही असे ठणकावूनच सांगितले जात आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अख्खे संविधान तपासून बघितले. पण, त्यात असे कुठेच आढळले नाही. पण, त्याच संविधानामध्ये आपला तिरंगा कसा असावा, त्याचा आकार-उकार कसा असावा याबद्दल खास टिप्पणी आहे.आपले राष्ट्रगीत कसं असावं, किती वेळात ते म्हटलं जाव ते देखिल संविधानाने ठरविले आहे. मग हे बदलण्याची भाषा करणारे राष्ट्रद्रोही नाहीत का ? अर्थात तेच खरे देशभक्त आहेत, कारण आता सत्ता त्यांची आहे.

भारत माता की जय ला आक्षेप कोणाचा आहे ? पण तुमच्या भारत मातेला मी जय का म्हणावं. तुमची भारत माता ही देवी स्वरुपात आहे.एका हातात त्रिशूळ, एका हातात भगवा आणि सिंहावर आरुढ झालेली देवी.पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये 1900 च्या दरम्यान असेच चित्र इथल्या जुन्या विचारांच्या संघटनांनी काढले होते.याचेच अनुकरण या चित्रामध्ये मला तरी दिसतेय. देवी म्हटल की सोवळ आलें,पूजा-अर्चा आली, जाती-भेद आलेच.मग तिला कुणी स्पर्श करायचा, कुणी नाही करायचा हा देखिल वाद उभा राहणारच. अर्थात देवी म्हटल की आमच्या सारख्यांच्या मनात मनुवाद्यांचा स्पर्श असलेली ही देवी असणार अशी शंका उपस्थित होणारच. ही भारतमाता सर्व समावेशक कशी होऊ शकते ? ज्या भारत मातेमध्ये अनेक बौद्ध धर्मीय आहेत, अनेक इस्लाम धर्मीय आहेत,अनेक ख्रिश्चन धर्मीय आहेत, जैन धर्मीय आहेत. पण, माझ्या भारत मातेच वर्णन करायच झाल तर ती माझी साक्षात आई आहे. तिच्या डोळ्यात करुणा आहे,माया आहे, प्रेम आहे ती सर्वसमावेश आहे. संत जनाबाईंनी विठूरायाचे जे वर्णन केले आहे. तशीच माझी भारत माता आहे. संत जनाबाई आपल्या अभंगामध्ये म्हणतात… “विठू माझा लेकूरवाळा । संगे गोपाळांचा मेळा” ।। त्याकाळात तिने विठूरायाचे वर्णन केल त्यावेळस जातीव्यवस्था ही घट्ट बसलेली होती. पण, शूद्र, अतिशूद्र असलेल्या काही संतांना विठूने कसं खांद्यावर घेतलय, मांडीवर बसवलयं,हातात घेऊन चाललायं असं वर्णन ती करते. आणि ती विठूरायाला सर्व समावेशक करते. संत जनाबाईंनी केलेल्या विठ्ठलाचे वर्णन हे माझ्यादृष्टीने माझ्या भारत मातेचे वर्णन म्हणजेच माझ्या आईचे वर्णन आहे. इथल्या गरीबातल्या गरीबाला आपली वाटणारी,उपेक्षितांना, सोशीतांना पोसणारी,दुखामध्ये आधार देणारी, आपुलकीने आपलं मानणारी अशी माझी आई होती आणि त्या आईचा जयजयकार कोण म्हणालं करणार नाही. पण तुमच्याच देवीचा जयजयकार झाला पाहीजे अस तुम्हांला का वाटते ? कशाला वाद निर्माण करता. माझ्यासारखे इतर लोकही असाच विचार करु शकतात की, देव आणि देवी आली की कोप आला, त्यांच्या दक्षिणा आल्या. परंतु माझ्या आईला काहीच लागत नाही.माझ्या आईच्या डोळ्यात फक्त करुणा दिसते. आणि तिच्या हातातून सगळ्यांना पोट भरुन अन्न दिले पाहीजे यासाठीच तिचे हात तळपत असतात.अशा या माझ्या आईचा जयजयकार करायला मला का लाज वाटावी, मला लाज वाटणारच नाही. आणि तुमच्याच देवीचा मी जयजयकार करावा असा तुमचा आग्रह असेल तर ते मला मान्य नाही. मलाच नाही तर या देशामधील अनेकांना तो मान्य होणार नाही.

दुसरी गोष्ट अशी की, या देशात न-राहून देण्याचा अधिकार तुम्हांला कोणी दिला आहे. या वादाबरोबरच भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा बदलून टाकावा असे म्हणण्याची हिम्मत भैय्याजी जोशी यांनी दाखवली. हा तिरंगा ध्वज नाही तर या देशाचा इतिहास आहे. त्याच्याकडे झेंडा म्हणून बघू नका तर अनेकांचे प्राण गवामून जे स्वातंत्र्य प्राप्त केलयं या स्वातंत्र्याच्या मिनीटा-मिनीटाचा इतिहास हा या झेंड्यावर लिहीलेला आहे. केवळ ब्रिटीशांच्या समोर हा झेंडा नाचवला म्हणून अनेकांनी गोळ्या झेलल्या. हा झेंडा हातात धरुन ब्रिटीशांवर धावून जाणा-यांना प्राण गमवावे लागले असा हा तिरंगा आहे. तो आज भारतामध्ये डौलाना फडकतोय. त्या तिरंग्यामध्ये असलेल्या भगव्या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो, पांढ-या रंगातून शांती,सत्य, व पावित्र्याचा बोध होतो. हिरवा रंग हा निसर्गाशी आणि भूमीशी असलेले नाते दर्शवतो व निष्ठा व समृद्धीचा बोध होतो. आणि मध्यभागी असलेले अशोकचक्र हे गतिमानता दर्शवते.

भगवा झेंडा आम्हांलाही प्रिय आहे. तो आजही आमच्या प्रत्येक वारक-यांच्या हातात आहे. ज्या संत तुकारामांच्या हातात भगवा झेंडा होता त्या संत तुकारामांनीच इथल्या चातुर्यवर्णाला आव्हान दिल होतं. हा शौर्याचा भगवा झेंडा आहे, त्यातही भर म्हणजे हा सुफी धर्मीयांचा भगवा झेंडा आहे, हा शिवरायांचा भगवा झेंडा आहे. पण,सर्वसमावेश तिरंगा हा या देशाचा इतिहास आहे. अर्थात तुमचा आणि या तिरंग्याचा कधी संबंध आलाच नाही.स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे आणि त्या अगोदरची अनेक वर्षे आपल्या कार्यालयावर आपण तिरंगा फडकवलाच नाही. तिरंगा हातातही धरला नाही. त्या तिरंग्याबद्दल तुमच्या मनात आदर असण अशी तुमच्याकडून अपेक्षा करणेच चुकीच आहे. ही अपेक्षा तुम्ही पूर्ण करु शकलात नाही तरी चालेल. पण कमीत कमी इतिहासाला नखे लावण्याच तरी काम करु नका.ज्या इतिहासाच्या कुठल्याही पानावरती तुमच्या नातलगांचा नामोल्लेख नाही.स्वातंत्र्य लढ्यात तुमच योगदान नाही.अशा लोकांनी आता भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाशीच खेळ करावा.हे भारताच दूर्देव आहे. या देशामध्ये भावनिक वाद घालून स्वत:ची राजकीय पोळी भाजणे हे तुमच्या सारख्यांना अनेकवेळा जमले आहे. कधी गंगेचे पाणी, तर कधी राममंदिराचा विषय, तर कधी मंदिर वही बनायेंगे, तर कधी लव जिहाद, एवढच नाही तर काही महिन्यापूर्वी गोमातेवरुन देशभर वातावरण गढूळ झालं होत ती गोमाता आता कुठल्या गोठ्यात आहे हे देखिल शोधून सापडणार नाही. कारण की,आसाम आणि केरळच्या निवडणूकांमध्ये गोवंश हत्येवर बंदी आणू असे आपल्या एकाही नेत्याने भाषणांत सांगितले नाही. म्हणजे महाराष्ट्रात एक आणि आसाममध्ये एक असे का ? हे न-समजण्याइतका भारतीय मूर्ख नाही. आणि प्रत्येक वेळेस हे मान्य नसेल तर देश सोडून जा.हा देश जसा तुमच्या बापाचा आहेच…तसा तो माझ्याही बापाचा आहे हे विसरु नका. या देशावर जेवढा तुमचा अधिकार आहे… तेवढा माझाही अधिकार आहे… आणि तो परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने मला दिला आहे.

– डॉ. जितेंद्र आव्हाड

टिप : पण एक गोंधळ मात्र आहे.गोळवलकर गुरुजी भक्त म्हणतात, की भारत ही माता आहे. सावरकर इतिहासाचे दाखले देत म्हणतात की भारत ही पितृभूमी आहे. कारण वेदामधून भारत हे नाव पुढे आलं. आता गोळवलकर गुरुजी म्हणतात भारत माता, सावरकर म्हणतात पितृभूमी. उद्या सावरकर भक्तांपैकी एकाने म्हटले पिताश्री भारत की जय. तर त्याला कुठल्या देशात टाकायचे हे एकदा ठरवून घ्या.