भारत माता कि जय

भारत माता कि जय

परवा रात्रीपासून सुरु झालेले “सर्जिकल आपरेशन” हे काही भारताने पहिल्यांदा केलेली कृती नव्हे. याआधी कित्येकदा अशा प्रकारची कृती भारताने केलेली आहे. यावेळी फरक फ़क्त एवढाच आहे की, या घटनेचे खुपच मस्तपैकी “इवेंट मॅनेजमेन्ट आणि मार्केटिंग” करण्यात आलेआहे. भक्त नावाच्या जातीची नवीन पैदास झाली आहे. त्यांचा पडलेला बाजारभाव वाढवण्यासाठी खुप ताकतीने ते कामाला लागते आहेत. पण याचे देशाला काय गंभीर परिणाम भोगावे लागतील याचा साधा विचारही करताने ते दिसत नाहीत. बीबीसीवर एक निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला नुकतच ऐकल. अमेरिकेलाही याची पूर्ण कल्पना देऊनकी, आम्ही केवळ पाकव्याप्त कश्मिरमधील आतंकवादयाविरोधी कृतीला उद्यापासून आरंभ करीत आहोत आणि या सर्जिकल आपरेशनची सुरुवात झाली. त्यामुळे हे काही पाकिस्तान विरोधातील पुकारलेले युद्ध नव्हे आणि तसे होऊही नये; याआधी “राममंदिर” सारख्या भावनिक मुद्द्याचा असाच एकदा राजकारणासाठी वापरझालेला देशाने बघितला आहे. आणि त्याचे परिणाम या देशातील अनेक गरीबांना सहन करावे लागले. याही वेळा “सर्जिकल ऑपरेशनला” युद्ध म्हणून ढोल पिटत आहेत. अनेकवेळा Line Of Control क्रॉस करणे ही भारतीय सैन्याच्या दृष्टीने नित्याचीच बाब आहे. पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्याच्या हालचाली ह्या नेहमीच दिसत असतात. पण, उरीच्या हल्ल्यानंतर खिंडीतच तिथल्या अतिरेक्यांची तळे उद्धवस्त करणे हा भारतीय सैन्याच्या कर्तव्याचाच भाग होता आणि प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान आहे.

अफगाणिस्तान मध्ये दहशतवादी तालिबानी हिंसाचार सुरु झाल्यावर असंख्य हल्ले अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानच्या लगत असलेल्या पाकिस्तानी क्षेत्रातील काही परिसरावर अमेरिका आणि रशियाने केले. सध्या ISI च्या नावाने सुरु असलेल्या जगभरातील दहशतवादाला धडा शिकविण्यासाठी इराक, रशिया, अमोरीका, फ्रान्स या अनेक राष्ट्रांनी सिरीयावर “सर्जिकल स्ट्राईक” केले. पण, कुठल्याही राष्ट्राने त्याला युद्ध म्हणून संबोधले नाही किंवा त्या-त्या राष्ट्राध्यक्षांच्या नावाचा अभिनंदनाचा पाऊसही पाडला नाही. कारण, ते करणे त्या राष्ट्राच्या दृष्टीने internal defence चा भाग म्हणून अतिशय महत्वाचे होते.

भारताने केलेली कारवाई हि काही आज पहिल्यांदा केलेली नाही आजवर अशी सर्जिकल ऑपरेशने ब-याच वेळा भारताने केलेली आहेत हे चॅनेल वर निवृत्त लष्करी अधिकारी सांगतात. पण गेल्या 70 वर्षात हे पहिल्यांदाच झालं असे ढोल पिटले जात आहेत. हा तर राजकीय आत्मस्थितीचा कळस आहे. या आधी भारताने पाकिस्तान विरुद्धची युद्ध जिंकली. 1965 साली पाकिस्तान विरुद्धचे युद्ध आपण लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. त्यानंतर 6 वर्षातच1971 साली इंदिराजी पंतप्रधान असताना पाकिस्तान विरुद्धचे युद्धजिंकून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्या वेळी पाकिस्तानचे 91000सैन्य पकडले गेले होते. पाकीस्तानी सैन्याला गुडघ्यावर आणण्याचे काम स्व. इंदिराजींनी केले होते. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि परराष्ट्र मंत्री हेन्री किसनंजर यांनी सातवा आरमार पाकिस्तानच्या समर्थनार्थ पाठवलेला असतानाही इंदिराजी डगमगल्यानाहीत’; “त्या म्हणाल्या “आज अमेरिकेने धमकीवजा निरोप दिलाय कि त्यांचं 7 व आरमार पाकिस्तानच्या बाजूने भारताविरुद्ध बंगाल च्या उपसागरात उतरेल. अमेरिकेचा मानवी हक्कांबद्दलचा ढोंगीपणा आज उघड झालाय पण मला त्यांना सांगायचं आहे कि भारत एकही पाऊल मागे हटणार नाही उलट अत्यंत निकराने हे युद्ध लढेल.

त्या नंतर लगेच 1974 साली पोखरण मध्ये अणुबॉम्ब च्या यशस्वी चाचण्या घेऊन इंदिराजींनी अमेरिकेलाही सूचक इशारा दिला.

कारगिल मध्ये जे झाला ते सुद्धा अभ्यासण्याची गरज आहे. कारगिलमध्ये पाकिस्तानने हळुहळु पाकिस्तानच्या सीमेलगतच्या बाजूने छावण्या निर्माण करायला सुरुवात केली. आणि तिथे गुरे चरण्यासाठी नेणा-या एका गुराख्याच्या मुलाने ही माहिती भारतीय जवानांना दिली आणि त्यानंतर भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य हाच भारताचा इतिहास आहे. ते युद्ध जिंकताना वापरण्यात आलेल्या बोफोर्स तोफांवरही टिकेचा भडीमार झालेला असतानाच त्याच तोफांनी भारतीय सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवला आणि कारगिल परत काबीज केले. ज्यांना-ज्यांना सन 65 आणि 71 चे युद्ध आठवत असेल त्यांना ते युद्ध लढत असताना एक अनुभव जो मी स्वत: अनुभवलेला आहे. तो म्हणजे Blackout संपूर्ण भारतात संध्याकाळी दिवे न-लावण्याचे आदेश सन 71 च्या युद्धात दिले गेले होते. वाहनांचेही दिवे बंद करण्यात आले होते. खासकरुन जी महत्वाची शहरे आहेत त्यांना तर हे आदेश काटेकोरपणे बजावण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात असत. सुरळीत जनजीवन विस्कळीत झाले होते. कारगील युद्धाच्या दरम्यान असे कुठले प्रकार भारतामध्ये झाले नाहीत.

सोशल मिडीया आणि काही उत्साही पत्रकार ज्या पद्धतीने उन्माद निर्माण करीत आहेत. तो निंदनीय नाही तर देशाला धोकादायक आहे. सन 1945 साली अण्वस्त्राचा पहिल्यांदा वापर झाला. त्याचे परिणाम आजही हिरोशीमा, नागासाकी भोगत आहेत. तेव्हा फक्त अमेरिकेकडेच अणुबॉम्ब होता. आज अणुबॉम्ब कोणाकडे आहे, कोणाकडे नाही याची कल्पना देखिल जगामध्ये कोणाला नाही. ही आपली ताकत आजमविण्याची परिस्थिती नसून मर्यादित स्वरुपात त्या राष्ट्राला समज देण्याची गरज आहे. आणि ती भारतीय सैन्याने दिलेली आहे. आम्ही काय-काय करु शकतो, तुम्हांला कसे ठेचू शकतो, तुमच्या नांग्या कशा मोडू शकतो हे भारतीय सैन्याने त्यांच्या भूमीवर जाऊन त्यांना दाखवून दिले. त्यात भारतीय सैन्याची शस्त्रनिती, युद्धनिती आणि शौर्यनिती ह्या तिनही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. पाकिस्तानचा झालेला केवीलवाणा चेहरा आणि त्यानंतर ते करीत असलेली सारवा-सारव त्यामुळे पाकिस्तान अंतर्गत पाकिस्तानची झालेली नामुष्की ह्याला भारतीय सैन्यच जबाबदार आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. पण, हे सगळ भारतीयांना अभिमानाचे वाटत असताना ह्या संपूर्ण प्रकरणाचा काही भक्त ज्या पद्धतीने उन्मादक भावनेतून हे व्यक्त करीत आहेत. त्याला कुठेतरी परिपक्वपणाने आवर घालण्याची गरज आहे.

त्यामुळे ह्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल नियोजनबद्ध पद्धतीने अतिरेक्यांचे ठाव-ठिकाणे शोधून त्यांच्यावर चढविलेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयांचा उर अभिमानाने भरुन आलेला असताना पक्षीय अभिनिवेष बाजूला ठेवून प्रत्येक राजकीय पक्षाने सरकारच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतलेली असताना भक्तांनी स्वत:ला आवरण्याची गरज आहे. कारण उद्या काही बरे-वाईट झाले तर धीरगंभीरपणे त्याचाही विचार करा फक्त एवढेच सांगण्याची गरज आहे.

-डॉ. जितेंद्र आव्हाड