कालाय तस्मै नम:

कालाय तस्मै नम:

शिवसेनेचा इतिहास ज्यांनी जवळून बघितला आहे, त्यांना हे सगळ आठवत असेलच की, कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर सुरु झालेला प्रवास हा टप्प्या-टप्प्याने पुढे गेला. कोणीही कितीही म्हणत असेल की शिवसेनेत बंड झाल नाही, तर शिवसेनेच्या आरंभालाच शिवसेनेत फूट पडली. अरुण मेहता व अ‍ॅडव्होकेट रामराव आदिक यांच्यासह अनेक शिवसैनिक शिवसेनेतून बाहेर पडले. त्याच दरम्यान बाळासाहेबांचा एक आवडता शिवसैनिक नाराजीमुळे शिवसेनेतून बाहेर पडून त्याने परळ सारख्या भागात प्रति शिवसेना स्थापन केली त्याचे नाव बंडू शिंगरे. पुढे १९७७ साली हेमचंद्र गुप्ते बाहेर पडले. त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवकही बाहेर पडले त्यावेळेस स्वत: मनोहर जोशी फुटणार होते असे काही शिवसैनिकांच्या तोंडातून मी स्वत: ऐकल आहे. पण,शिवसैनिकांच्या दबावामुळे ते दोन पाऊल मागे गेले आणि ते शिवसेनेतच राहिले.

1979-80 च्या काळात कम्युनिस्ट पार्टीचे नेते कृष्णा देसाई यांच्या खुनामधील एक प्रमुख आरोपी दिलीप हाटे जे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत AISO नावाची विद्यार्थी संघटना काढली. ही संघटना काढून ते थांबले नाहीत. तर, सातत्याने 3 वर्षे त्यांनी शिवसेना पुरस्कृत विद्यार्थी संघटनेचा पराभव करत मुंबई विद्यापीठावर कब्जा मिळविला.

मग शिवसेनेच्या सुरुवातीलाच उठाव लुंगी.. बजाव पुंगी म्हणत, मद्रासी समाजा विरुद्ध आक्रोश करत मराठी माणसाला एकत्र करण्याची पहिल्यांदा हाक दिली. मुंबईमध्ये त्यावेळेस असलेली मराठी माणसाची टक्केवारी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला यश देखील मिळाले. व त्याच दरम्यान दादर येथील भाषणात स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, मला ६५ % लोकांचे राजकारण करायचं. उरलेले ३५ % म्हणजे कोण ? तर ते आताचे दलित आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी. तसेच मुंबईतील गेल्या ५० वर्षात झालेल्या दंगलींमध्ये शिवसेना विरूध्द दलित ह्या वरळी आणि परळ भागात झालेल्या दंगलींच्या स्मृती आजही अनेकांच्या मनामध्ये आहेत.

शिवसेनेच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि पहिल्या काळातच त्यांनी मुंबईवर पकड निर्माण केली. कॉंग्रेस त्यांना मदत करत होती असे आजही समाजात म्हटले जाते. त्याबद्दल न-बोललेलेच बरे.

1985 साली वसंत दादांनी एक वाक्य उच्चारले“दिल्लीच्या मनात मुंबईला वेगळे करण्याचा डाव आहे” आणि शिवसेनेला राजकीय लाभ झाला आणि शिवसेना पहिल्यांदा मुंबईत सत्तेवर आली.

ग्रामीण महाराष्ट्रमध्ये अनेक नेते फिरत होते आणि त्यामध्ये त्यात एक महत्वाचे नाव होते ते म्हणजे छगन भुजबळ. सन 1980-90 च्या दशकामध्ये काँग्रेस सोडून गेलेले शरद पवार साहेब हे काँग्रेसमध्ये परत एकदा सामिल झाले. उलथा-पालथ झालेल्या राजकारणामध्ये अनेक ओबीसी तरुण हे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एकत्र आले व कधी नव्हे तेवढे यश सन 1990-91 च्या विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेला मिळाले. ओबीसीचा मोठा गट बरोबर असताना मात्र जेव्हा मंडळ आयोगाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा सेनेने मंडळ आयोगाच्या विरुद्ध भूमिका घेतली. पण जस मंडळ आयोगाचे वातावरण देशभरात तयार झाले तेव्हा बीजेपी बरोबर युती करून हिंदुत्वाची लाईन घेतलेल्या शिवसेनेने कमंडळची बाजू घेतली. इथल्या ओबीसी ने एकत्र येऊ नये, इथल्या शुद्र आणि अतीशुद्रांनी एकत्र येऊ नये हा बीजेपीचा प्रयत्न होता आणि त्यातूनच राम मंदिराचे प्रकरण वरती आले. तेव्हा मंडळशी लढायला आपण धर्माचा वापर करावा अस काही त्या तत्कालिन बुद्धिवंतांच म्हणण होत. तशी मंडळ विरुद्ध कमंडळ लढाई देखिल झाली. त्यावेळेस शिवसेनेने मंडळ आयोगाला विरोध केला. आणि त्यात शिवसेनेनेत पहिल्यांदा फुट पडली. ओबीसीचा एवढा भक्कम पाठींबा असून देखिल शिवसेनेने घेतलेल्या नाराजीबाबत उघडपणाने भूमिका घेत अनेक आमदारांसह छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले.

1980-90 च्या दशकामध्ये जगन्नाथ पाटील (आगरी) आणि कांती कोळी (कोळी) ह्या दोघांविरुद्ध प्रचार करताना आगरी समाजाने फक्त हातभट्टी लावावी आणि कोळी समाजाने मासे पकडण्यासाठी जाळी विणावी अशा प्रकारची टिका बाळासाहेबांनी ठाणे आणि डोंबिवलीमध्ये येऊन केली.

काळ पुढे गेला आणि 1993 साली नामांतराचा प्रश्न उभा राहिला. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा 1977 सालचा ठराव हा अंमलात आणावा लागेल हे तत्कालिन मुख्यमंत्री श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या मनात होते. त्यांनी तेव्हा उघडपणाने भूमिका घेतली की, ज्या फुले, शाहू, आंबेडकरांचे मी नाव घेतो त्या महाराष्ट्रामध्ये मी शब्द दिला आहे. आणि या सभेचा तसा ठराव असल्याकारणाने हे नाव दिलेच गेल पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका होती. तेव्हाची दोन वाक्य आजही मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक दलिताच्या मनात आहेत. ते म्हणजे “मराठवाड्याचा आता तुम्ही महारवाडा करणार का ?” आणि“ ज्याच्या घरात नाही पीठ तो मागतो विद्यापीठ” ह्या भूमिकेमुळे कदाचित शिवसेनेला लाभ झाला असेल. सन 1995 च्या निवडणूकीमध्ये मराठवाड्यामध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले. काँग्रेसची सत्ता गेली. पण, सर्वाधिक बहुजन आमदार असतानाही शिवसनेत मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. काळ पुढे-पुढे जात होता… त्याच दरम्यान गणेश नाईक हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्याची कारणे काहीही असो… पण गणेश नाईक यांच्यासारखा दिग्गज नेता, आगरी समाजाचा प्रतिनिधी हा त्याच दरम्यान बाहेर पडला.

1999 साली सत्ता गेली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच शिवसेनेमध्ये धूसफूस चालू असल्याचे दिसून आले आणि थोड्याच दिवसात नारायण राणे या संघटनेतून बाहेर पडले. त्याच दरम्यान जेम्स लेन प्रकरण महाराष्ट्रात गाजू लागले. मराठा समाजामध्ये त्याबद्दल प्रचंड राग होता. जिजाऊंची बदनामी झाल्याचे स्पष्टपणाने दिसत असताना राजकीय भूमिका घेण्यास शिवसेना मागे पुढे झाली असे त्यांना वाटत होते. पण, शिवसेनेने भूमिका घेतली. पण, ती भूमिका काय होती. तर ज्यांनी भंडारकर इन्स्टिट्युटवर हल्ला केला त्यांच्या विरोधात शिवसेना उभी राहिली त्याची भूमिका जेम्स लेनला मदत करणार्‍यांच्या बाजूने होती. आणि शिवसेनेने जाऊन जेम्स लेनच्या पुस्तकामध्ये शिवरायांच्या बदनामीला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे तुम्ही इतिहास संशोधक आहात असे म्हणत माफी मागितली. शिवसेना विरोधी पक्षातच काम करत होती.

प्रवास पुढे चालूच होता… आणि सन 2014 साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. पहिल्याच वर्षी महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात आला.बाबासाहेब पुरंदरेंनीच जेम्स लेनला माहिती दिल्याचे मराठा समाजाच्या मनात घट्ट बसले होते. बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाला विरोध करण्यासाठी म्हणून गावोगावी शिवसन्मान परिषदा आयोजित करण्यात आल्या. त्या परिषदांना मिळणारा पाठींबा आणि समर्थन हे मी स्वत: बघितले आहे. लोक गावा-गावामध्ये वर्गणी काढून सभा आयोजित करीत असत. आणि माझ्यासारख्या ओबीसी समाजातील वक्त्याला बोलावून सभेचे आयोजन करीत होते. समाजांमधील भिंती तुटल्या होत्या आणि शिवाजी महाराजांच्या काळातील बहुजन एकत्र झाल्याचे दिसत होते. मी गावात गेलेल्या प्रत्येक सभेमध्ये मुसलमान, दलित, ओबीसी मराठा हे सगळे वर्ग एकत्र आल्याचे दिसत होते व सभेचे आयोजन देखिल तेच करताना दिसत होते. किंबहुना मराठा समाजाचे भावनिक एकत्रिकरण ह्याला जबाबदार कोण असेल तर महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार आहे. असे म्हटल्यास काहीच वावगे ठरणार नाही. आम्ही 6 ते 8 महिने महाराष्ट्रात फिरलो. पण, महाराष्ट्रातील गावागावामध्ये पुरंदरेंनी लिहीलेल्या इतिहासाबद्दल आणि मातेसमान जिजाऊंच्या झालेल्या बदनामीबद्दल सर्वसामान्यांच्या मनात चीड होती आणि ती चीड आजही कायम आहे. तेव्हा देखिल शिवसेनेने भूमिका घेतली नाही. त्यामुळे शिवसेनेचा इतिहास आणि शिवसेनेचा प्रवास हा ज्यांनी-ज्यांनी पाहिला आहे, अभ्यासला आहे त्यांच्या-त्यांच्या हे लक्षात येईल की, राजकारणाच्या पटावर शिवसेना नेहमी तिरकीच चाल चालत आली आहे. आणि त्यातही ते यशस्वी झाले आहेत. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेकवेळा अनेक समाजांना डिवचून सुद्धा, अंगावर घेऊन सुद्धा शिवसेनेने माफी मागितली असे कधीही झालेले नाही. मात्र, मराठा समाजाच्या ऐक्यापुढे पहिल्यांदा शिवसेनेची मान झुकली आणि शिवसेनेला माफी मागावी लागली. याचे राजकीय परिणाम-दुष्परिणाम काय होतील…?

त्यांच्या तोंडातून पडलेला शब्द मागे घेण्याचा प्रकार शिवसेनेत कधीच घडला नाही. जे बीजेपी करु शकले नाही. ते शिवसेनेने करुन दाखवले. मुसलमानांना त्यांनी कधीही प्रेमाने मुसलमान म्हटले नाही. किंबहुना त्यांना पाकड्या, लांड्या म्हणण्यातच ते स्वत:ला धन्य समजत होते. त्यामुळे जातीय द्वेष वाढवणे ह्याच राजकारण गेली 60 वर्षे त्यांनी महाराष्ट्रात केल. पण, राजकारणाच्या गणितात ते नेहमी यशस्वी ठरले. एका ज्येष्ठ संपादकाला दिलेल्या मुलाखतीत संपादकांनी विचारले की, बाळासाहेब तुम्ही असे बोलता त्यामुळे समाजामध्ये काहीजण नाराज होतात. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, माझ्या मनात येईल ते मी बोलतो, मला जे आवडते ते मी बोलतो. त्याचे परिणाम काय होतात याची काळजी मला नाही. कारण निवडणूक मला लढवायची नाही. निवडणूक जोशी, नवलकर यांना लढवायची आहे. पडले तर ते पडतील. मी पडणार नाही. अशी थेट भूमिका घेणा-या शिवसेनेने कधीही माफी मागितल्याचा इतिहास महाराष्ट्राला आठवत नाही.

जन्मानंतर आजपर्यंतच्या प्रवासामध्ये अनेकवेळा बहुजन विरोधी भूमिका घेऊन सुद्धा बहुजनांची मते मिळणे या राजकीय गणितामध्ये शिवसेना यशस्वी ठरली. चंद्रकांत खैरेंसारखे स्वत:च्या जातीची 100 मते नसलेले शिवसैनिक खासदार झाले. हे गणित सोडविता येणार नाही. चेहरा बहुजन विरोधी. पण, मते बहुजनांची. काही असो… पण, ह्यावेळेस मात्र त्यांना मराठा समाजाच्या रेट्यापुढे आणि कदाचित महानगरपालिका निवडणूकीच्या गणितामुळे दोन पाऊले मागे जाऊन माफिनामा सादर करावा लागला. काळ बदलला… की शिवसेना बदलली हे काळाच्या ओघात समजेल. सद्ध्या एवढेच म्हणावेसे वाटतय… कालाय तस्मै नम:

-डॉ. जितेंद्र आव्हाड

Email – [email protected]
Twitter – @Awhadspeaks
Facebook – facebook.com/jitendra.awhad
Mobile No. – 9820055300

शरद पवार – एक थोर नेता

शरद पवार – एक थोर नेता

शरद पवार – एक थोर नेता – एक उत्तुंग व्यक्तिमत्व
शरद पवारसाहेब – भारतीय राजकारणातला एक द्रष्टा नेता. सदैव जनतेच्या नाडीवर हात असलेला, जनतेच्या हितासाठी झटणारा, जनतेची अस्मिता जागवणारा, जपणारा नेता…. या लेखात मी साहेबांच्या जडणघडणीचा, वाटचालीचा आलेख घेत आहे…

एखाद्या नेत्याचे नेत्त्रुत्वगुण हे अनेक वर्षांच्या अथक प्रयत्न व समाजासाठी केलेल्या कामांमधून सिद्ध होते. त्याच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात. पण त्यातच त्याच्या कसबाची कस लागते. सर्व कठीण परिस्थितीतून जो यशस्वीपणे बाहेर पडतो तोच नेता मानला जातो. लोककल्याणासाठी सातत्याने झटणारा नेताच लोकमानसात उतरतो.

शरद पवार यांचे नेतृत्व हे महाराष्ट्रातील नाही तर सार्‍या देश्यातील लोकांनी मान्य केले आहे.. पवारसाहेब हे सत्तेवर असले काय किव्वा नसले काय, ते कायम लोक्संपर्क ठेवून असतात. ते आपली नाळ लोकांपासून तुटू देत नाही. लोकांच्या नाडीवर बोट ठेवून तो लोकांशी संवाद साधतो. पवार साहेबांचा लोकसंपर्क रावांपासून रंकांपर्यंत आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी कामांचा डोंगर रचला आणि कर्तृत्वाचा सह्याद्री उभा केला.

शरद पवारांच्या राजकारणाला समाजकारणाचा आशय प्राप्त झालेला आहे. राजकारण हे समाजाची उन्नती करण्याचे एक साधन आहे असे साहेब नेहमी म्हणतात. आणि त्याच अनुषांघाने त्यानी वेळोवेळी घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राला वैभवाच्या काळाकडे नेणारेच होते. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी रोडमॅप तयार केला. पवार साहेबांनी त्यानुसार वाटचाल केली. त्यात काळानुरूप बदलही केले.

शरद पवार साहेब हे खरेच एक धैर्यशील वा द्रश्ते नेते आहेत. ते नेहेमीच परिस्स्थिति पाहून आणि तिला पोषक असा योग्य तोच निर्णय घेतात. मग प्रसंगी कॉंग्रेस पासून वेगळे होऊन १९७८ मधे पुलोद स्थापन करणे असेल किव्वा १९९९ मधे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ची स्थापना करणे असेल.

पवार साहेबांनी महाराष्ट्रात रोजगार हमी योजना जोमदारपणे राबविली, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय घेतला, महिला धोरण ठरविले व ते कार्यान्वित केले, सहकारी चळवळीला दिशा दिली, राज्यात नवीन विद्यापीठांची स्थापना केली, फलोत्पादनाला प्रोत्साहन दिले, सर्वच क्षेत्रांत महिलांना समान संधी दिली, मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारून इतर मागासवर्गीयांना न्याय दिला, जिल्हा परिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिले आणि कर्जमाफीच्या द्वारे शेतकऱ्यांना दिलासा दिला.

जनतेला माहीत नसलेले पण महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे निर्णय पवार साहेबांनी घेतले आहेत. ते असे:
1) मुख्यमंत्री असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण साहित्य 18 मोठ्या खंडांत इंग्रजीत व मराठीत प्रसिद्ध केले.
2) महात्मा फुले यांचे समग्र साहित्य व विचार मराठी , हिंदी व इंग्रजी या तीन भाषांत प्रसुत करण्याची भूमिका त्यांनी बजावली आहे.
3) तिसरे तेवढेच महत्वाचे अनमोल कार्य म्हणजे मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळात पास करून घेतले.

पवार साहेब आज एक राष्ट्रीय नेते आहेत.. एक उत्तम संसदपटू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यांचे विरोधकही त्यांच्याविषयी आदराने बोलतात व वागतात. ते स्वतंत्र बाण्याचे आहेत. कृषिमंत्री या नात्याने शरद पवारांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक स्वरूपाचा होता. कृषिक्षेत्रातील गुंतवणूक चार टक्‍क्‍यांपर्यंत वाढली. अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी ठरले.

शरद पवारसाहेब कमी बोलतात पण जे बोलतात त्यामागे विचार, तत्त्व, सत्त्व, महत्त्व, प्रभुत्त्व, विद्वत्ता, अनुभव असतो.

स्वतः च्या प्रकृती स्वास्थ्याला दुय्यम स्थान देऊन ते सामान्य माणसाच्या समृद्धी साठी अथक परिश्रम करत आहेत .

त्यांचा आज वाढदिवस. ७५ वर्षात त्यांनी पदार्पण केले. पण त्यांची कामाची पद्धत, उमेद पाहिली की वाटते ते अजून तरुण आहेत. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव त्यांना उदंड आयुष्य देवो वा त्यांचे मार्गदर्शन आम्हाला सदैव मिळत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.