विद्येविना मती गेली ।
मतीविना गती गेली ।।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।।
वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
म्हणायला गेलं तर तीन ओळी, एक अखंड. पण विचार म्हणून ही अक्षरं एकत्रित वाचली तर त्याच ओळी अखंड क्रांतीची मशाल बनून उभ्या ठाकतील. हो, अखंड क्रांतीची मशाल. महात्मा फुल्यांनी दिलेला मुक्तीचा, क्रांतीच्या पथावरच आधुनिक भारताच्या जडणघडणीची बीजं रोवलेली आहेत यात कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही.
तसा जोतीबांचा जन्म माळी कुटूंबातला. माळी जमीनीतली नासकी बीजं, तण उपटून काढून जमीन फुलांना जन्म देण्यासाठी सुपीक बनवतो. आणि फुलांच्या बागा घडवून आणतो. महात्मा फुल्यांनी तेच केलं. अज्ञान, अंधश्रद्धा, जातीवाद, वर्णव्यवस्थेच्या गाळात रूतून बसलेल्या तत्कालीन समाजाला विद्रोह करण्याच्या काबील बनवलं. त्यांच्या मानसिकतेत बसलेली जातीवादाची, पराजयाची, अज्ञानाच्या तणांचं मूळ कायमचं उपटून काढलं. शिक्षणाचं, स्त्री-शिक्षणाचं, स्त्री-पुरूष समानतेचं, आधुनिकतेचं, प्रागतिकतेचं बीज रोवलं आणि आधुनिक भारताच्या पायाभरणीसाठीची जमीन अधिकाधिक सुपीक केली.
आधुनिक भारताचा इतिहास मोजायचा झालाच तर आपल्याला सुरूवात करावी लागते ती एकोणीसाव्या शतकापासून. तोच भारताच्या रेनिसांसचा खरा काळ. प्रबोधन, बंडखोरी, विद्रोहाचं अत्युच्च रुप, त्याची सुयोग्य रचना ही त्या काळानेच पाहीलं आणि त्याचे आद्य प्रणेते ठरले ते महात्मा फुले. महात्मा फुले आद्य प्रणेते यासाठी ठरले, कारण त्यांनी केवळ वरवरच्या सुधारणांना आपलं हत्यार न बनवता थेट प्रहार करण्यास सुरूवात केली.
पहिला प्रहार होता तो स्वतःच्या पत्नीला शिक्षित करून पुण्यात देशातील
मुलींसाठीची पहिली शाळा काढण्याचा. स्त्री-शिक्षणाशिवाय स्त्रीयांची गुलामगिरी नष्ट होणे शक्य नाही. त्यासाठी त्यांनी सर्वात आधी आपल्या पत्नीला साक्षर केले. तीला शिक्षिका बनवले आणि समस्त स्त्रीयांना शिक्षित करण्यासाठी प्रेरित केले. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. विधवांचं केशवपन थांबवलं. 1882 साली विल्यम हंटर शिक्षण आयोगा समोर साक्ष वा निवेदन देताना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची त्यांनी जोरदार मागणी केली. सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे हा विचार सर्वप्रथम मांडणारे महात्मा फुलेच होते.
तत्कालीन धर्मसत्तेच्या अधिराज्याचा मुख्य पाया होता तो वेद, पुराणं, मनूस्मृती, आदी धर्मशास्त्रे. ज्यांच्या आधारे समाजातील तमाम शुद्रातिशुद्र आणि स्त्री वर्गाचे दमन करून स्वतःची वर्णवर्चस्ववादी सत्ता गाजवण्यात ब्राह्मण समाज अग्रेसर होता. जोतीबांनी थेट धर्मसत्तेलाच आव्हान दिलं. हे आव्हान साधं सुधं नव्हतं. त्यांनी धर्मसत्तेला, धर्मशास्त्रांना, त्यांच्या सत्ताधीशांना सरळ नाकारलं. स्वतःचं साहित्य उभं केलं. साहित्यातून सांस्कृतिक राजकारण जन्माला घालत सांस्कृतिक क्रांती घडवून आणली.
जोतिबा फुले हे मराठीतील आद्य नाटककार आहेत. त्यांचं पहिलं नाटक तृतीय रत्न हे मराठीतील पहिलं लिखित नाटक त्यांनी वयाच्या 28 व्या वर्षी लिहीलं. ते साल 1955 चं असावं बहुतेक. पण सनातनी कर्मठांच्या विरोधामुऴे ते नाटक प्रसिद्ध होऊ शकले नाही. या नाटकाच्या रचनेमागे त्यांचा खास असा हेतू होता. ते लिहीतात..
‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या नि:पक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून सन १८५५ सालात दक्षिणा प्राइझ कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वत:च्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली. ”
सदर नाटक रंगभूमीवर आले की नाही याबद्दल माहीती उपलब्ध नाही पण 1980 सालच्या पुरोगामी सत्यशोधक या पत्राच्या एका अंकात मी ते वाचल्याचे मला स्मरते. आपला सुधारणेचा, परिवर्तनाचा लढा हा अधिक यशस्वी होण्यासाठी त्यांना नाटके हे महत्त्वाचे माध्यम वाटत असे. त्या अनुषंगानेच त्यांनी नाटकाचा एक प्रभावी माध्यम म्हणून वापर करण्याचे ठरवले होते.
1888 साली महात्मा फुले प्रिंस ऑफ वेल्सच्या भेटीसाठी गेले तेव्हा ते शेतकऱ्यांच्या पेहरावातच गेले होते. कमरेला लंगोटी, डोक्याला मुंडासं, खांद्यावर घोंगडी असा पेहराव करण्यामागे मूळ हेतू हाच की, राजवाड्यात राहणाऱ्या राजाला आणि त्याच्या आईला म्हणजे इंग्लंडच्या राणीला भारताची सद्यस्थिती कळायला हवी. या भेटीत त्यांनी प्रिंस ऑफ वेल्सला खरा भारत हा खेंड्यात राहतो, एकदा खेड्यात जा, अस्पृश्यांच्या वस्त्यांना भेट द्या असे खडे बोल सुनावले. शिक्षणाचा उपयोग जीवनात व्हावा, शेतक-यांच्या मुलांनी शेती शिक्षण घेऊन त्याचा उपयोग शेतीसाठीच करावा, असे त्यांना वाटत होते. ते शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत. शेती सुधारणा, पाण्याचा संचय हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते.
शिवशाहीनंतर महाराष्ट्रात अवतरलेल्या पेशवाईनं शिवाजी महाराजांचा इतिहास झाकोळून टाकण्याचा आटोकाट प्रय़त्न केला. शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा जतन केली नाही. महात्मा फुल्यांनी अतिशय कष्टानं ती शोधली. त्यावेळी रायगड हा अतिशय जीर्ण अवस्थेत होता. सर्वत्र झुडूपांचे साम्राज्य पसरलं होतं. गडावर जाण्यासाठीची असलेली पायवाटही नष्ट झालेली होती. अशा सर्व संकटांवर मात करत त्यांनी शिवरायांची समाधी शोधून तीचा उद्धार केला. शिवाजी महाराजांना गो-ब्राह्मण प्रतिपालक या चौकटीतून सोडवून ‘कुळवाडीभूषण रयतेचा राजा’ म्हणून जोतिरावांनीच साऱ्या जगासमोर आणले. शिवरायाचे खरे गुरू ह्या त्यांच्या मातोश्री जिजाबाईच हे त्यांनी आपल्या पोवाड्यांतून सांगितले. जर जोतिबा नसते तर शिवराय कधीच काळाच्या गर्तेत लूप्त झाले असते. जसे की आताही काही बाबासाहेब पुरंदरे प्रणीत संशोधक इतिहासाची भेसळ करण्यात मग्न आहेत अगदी तसेच. याच भेसळकारांनी शिवचरित्राचे विकृतीकरण करत दादोजी कोंडदेव नावाचे डमी कॅरेक्टर शिवचरित्रात घुसवले होते. ते फुल्यांनी साध्या उल्लेखात सुद्धा आणलेले नाही.
महात्मा फुले हे काळासोबत चालणारे द्रष्टे अन् कृतीशील विचारवंत होते. त्याची दोन मुख्य उदाहरणं म्हणजे त्यांनी लिहीलेले दोन ग्रंथ. गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड. गुलामगिरी ग्रंथात त्यांनी सनातनी हिंदू धर्माची सविस्तर चिकित्सा केली आहे. भारतात गुलामगिरी कशी आली, जेते आणि जीत यांतील नेमका फरक, परकियांचं आक्रमण यावर थेट प्रकाश टाकला आहे. आणि याचा सहसंबंध त्यांनी आफ्रीकन-अमेरिकनांच्या गुलामगिरीशी जोडून पाहीला. एकोणीसाव्या शतकात इतक्या मोठ्या पातळीवर विचार करणाऱ्या फुल्यांनी गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील काळ्या लोकांच्या संघर्षाला अर्पण केला आहे.
त्यांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड… तत्कालीन कालखंडात शेतकऱ्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेला भट-ब्राह्मणांची लूटमार जेवढी कारणीभूत होती त्याहून कैक अधिक कारणीभूत ही ब्रिटीश सत्तेने राबवलेली आर्थिक धोरणं होती. हा आसूड इतका भयानक होता की सारी व्यवस्थाच त्याने हादरून गेली. भारत कृषीप्रधान देश असूनही कुणालाही शेतकऱ्यांच्या दयनीयतेवर प्रकाश टाकणारं लेखन करावं असं वाटलं नाही. जोतीबा फुले हे शेतकऱ्यांच्या अवस्थेवर बोलणारे पहिले व्यक्ती होते. दुष्काळाच्या कालखंडात सावित्रीमाईंच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा छावण्या चालवल्या. अन्नछत्रे चालवली. हे फक्त फुलेच करू शकत होते.
महात्मा फुल्यांनी माणसांची पिळवणूक, फसवणूक करणाऱ्या, माणसाला हीन लेखणाऱ्या धर्मव्यवस्थेवर जबरदस्त हल्ला चढवला. ते कधीच हिंदूहितवादी वा संरक्षणकर्ते नव्हते. धर्मविंध्वसनाची भूमिका त्यांनी मांडली. नव्या शोषणमुक्त धर्मरचनेची, समाजरचनेची मांडणी केली. त्यांनी केलेली सत्यशोधक समाज किंवा सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना हे त्याचेच स्पष्ट रूप आहे. समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा, दैवीशक्ती, चमत्कार, साक्षात्कार अशा भ्रामक कल्पनांना मूठमाती दिली. त्यांनी परशूरामाला लिहीलेली पत्रे एकदा जरूर वाचावीत. म्हणजे फुल्यांचा रॅडिकल थॉट हा किती सरळ होता हे आपल्याला कळून येईल. ‘शूद्र-अतिशूद्रांच्या जीवनात घडलेल्या अनर्थाला फक्त अविद्या जबाबदार आहे असं त्यांनी ठासून बजावलं. सामाजिक विषमतेच्या मुळाशी असलेल्या धर्मव्यवस्थेशी भिडूनच पुरोगामी विचारांची परंपरा महाराष्ट्राला, देशाला दिली.
आज महात्मा फुलेंचा सत्यशोधक विचार संपूर्ण भारतभर पसरला आहे. बहुजन समाजाच्या विचारप्रक्रियेत तो आद्यस्थानी आहे. प्रबोधनाच्या प्रोसेस मध्ये तो महत्त्वाचा गाभा म्हणून कार्यरत आहे. आधुनिक भारताचा पाया जोतीबांच्या विचारसरणीवरच उभा राहीला आहे. त्यांच्याशिवाय भारताचं स्वप्न पाहणं केवळ अशक्य.
जय ज्योती…
डॉ. जितेंद्र आव्हाड