प्रचंड मोठ्या बलिदानानंतर साकार झालेल्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा उद्या 14 जानेवारी रोजी 23 वा वर्धापन दिन. नामांतर लढ्यात शहिद झालेल्या, घरदार, उभ्या शेतातील जोमदार पीक जाळली गेल्यानंतरही कच न खाणाऱ्या तमाम भीमसैनिंकाना कोटी कोटी अभिवादन. कदाचित येणाऱ्या पीढीला हा संघर्ष केवळ बातमीच्या रुपानं किंवा लेखांच्या रुपाने वाचायला मिळेल पण त्या लढ्यामागची तीव्र भावना, अस्तित्व सिद्ध करण्याची जिद्द कळेलच असे नाही.
1978 साली दलित पँथरच्या एकिकरणा निमित्ताने झालेल्या जाहीर बैठकीत नामांतराचा मुद्दा चर्चेला आला. तसं पाहीलं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं आणि मराठवाड्याचं विशेषतः औरंगाबादचं जिव्हाळ्याचं नातं. याच औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद कॉलेजची स्थापना केली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. त्या महामानवाचे या क्षेत्रावर अनंत उपकार आहेत. त्याचीच एक परतफेड म्हणून मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यात यावं असा ठराव आंबेडकरी जनतेने केला. त्यावेळेस मा. शरद पवार साहेब राज्यात पुलोदचे मुख्यमंत्री होते. दलित पँथरच्या नेत्यांनी नामांतराची मागणी मुख्यमंत्र्यांकडे सादर केली. पवार साहेबांनी सुद्धा या मागणीला दुजोरा देत नामांतराचा प्रस्ताव कबूल करत लवकरच नामांतर करण्याचे आश्वासन दिले. सारे काही सुरळीत होईल अशी अपेक्षा असताना मात्र सनातनांच्या जातीयवादी वृत्तीने अचानक फणा वर काढला. नामांतर समितीसारखी नामांतर विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे आणि विरोधाचे नेतृत्व केले ते गोविंदभाई श्रॉफ यांनी. वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत तसे कालकथित बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा स्वतःचं राजकारण रेटण्यासाठी अतिशय हीन भाषेत नामांतराची निर्भत्सना केली. याचा परिणाम असा झाला की, नामांतर विरोधी कृती समितीचे गुंड मराठवाड्यातील जिल्ह्यांत अल्पसंख्यांक असलेल्या दलितांच्या वस्त्यांवर आक्रमण करू लागले. शेतं जाळली. घरांवर, झोपड्यांवर पेट्रोळचे जळते गोळे फेकून ते पेटवण्यात आले. या अमानुषतेला दलित पँथरच्या तरूणांनीही निकराने लढा देत जशास तसे उत्तर दिले खरे. पण, मराठवाडा जळत राहीला. दंगल धगधगत राहीली. गवई बंधूचे डोळे फोडण्याचे प्रकरण असो किंवा पोचीराम आणि चंदर कांबळे या बापलेकांच्या निर्घृण हत्या असोत किंवा बनसोडे नामक महिलेवर केलेला बलात्कारासारख्या घटना आजही अंगावर शहारे आणणात.
मातीतून माणसं घडवलेल्या, आधुनिक भारताचा पाया रचलेल्या बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यावं एवढी माफक मागणी तर आंबेडकरी जनतेने केलेली होती. मग त्याला एवढा विरोध होण्याचं कारण तरी काय होतं. कारण एकच. मनामनांत वसलेला विखारी जातीयवाद. आंबेडकर नावाच्या महाराची पाटी विद्यापीठावर लागणं, बाबासाहेबांच्या नावाची डिग्री घरात लागणं हा अनेकांच्या जातीयवादी अहंकाराला ठेचू पाहत होता. त्यावरूनच हे रणकंदन माजलं होतं. 1986 साली पवार साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस प्रा. अरूण कांबळे यांच्या सुचनेवरून पवार साहेबांनी नामांतराचा विषय पुन्हा चर्चेला आणला. मात्र तो ठराव पारित करून घेण्यास यावेळीही यश आलं नाही. 1993 साली शरद पवारांनी पुन्हा एकदा नामांतराचा निर्णय घेतला. त्यावेळेस सत्तेत असणाऱ्या सोबत्यांनी पवारांना हा निर्णय तुम्हाला सत्तेबाहेर काढेल अशी भीतीही दाखवली. पण पवार साहेबांनी कोणत्याही भीतीला, कोणाच्याही विरोधाची भीड न बाळगता, सर्व आंबेडकरी नेत्यांना विश्वासात व सोबत घेऊन विद्यापीठाचा नामविस्तार घडवून आणला. या निर्णयाची त्यांना जबर राजकीय किंमत मोजावी लागली. पण पराभवाच्या भीतीपोटी त्यांनी पुरोगामीत्वाची साथ सोडली नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे.
पण खरंच या नामांतराने आपण काय साधलं हा प्रश्न आज जर आपण स्वतःला विचारला तर आपलं काय उत्तर असेल बरं ? विद्यापीठाच्या लढ्यासाठी उभं राहीलेलं आंदोलन स्वतःच्या अस्तित्वाच्या संघर्षासाठी होता. पण आजही देशातल्या विद्यापीठात दलित विद्यार्थी सुरक्षित नाहीत. रोहित वेमुलाच्या संस्थात्मक खुनाची घटना अजूनही ताजी आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आजही आपण समाजात रुजवण्यात कमी पडलो आहोत हे वास्तव स्विकारूनच आपण पुढे जायला हवे.
आज औरंगाबादला विद्यापीठाच्या कमानीवर तमाम आंबेडकरी अनुयायी नामांतर वीरांना अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फुलं अर्पण करतील. नामांतराच्या लढ्यात शहिद झालेल्या वीरांच्या माता भगिनी गुळाचा पाक आणि निळीच्या मळवटीची परात कडेवर घेऊन आनंदानं लोकांना भेटताना दिसतील. कारण त्यांच्यासाठी उद्याचा दिवस हा कृतज्ञतेचा दिवस आहे. ही कृतज्ञता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त जनांसाठी केलेल्या कार्याला अभिवादन म्हणून असेल. असा सोहळा जगात अन्य कुठेही होत नसावा. नामांतर दिनाच्या पूर्वसंध्येला या संघर्षरत लढ्याची आठवण व्हावी, त्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठीच हा छोटासा लेखनप्रपंच योजला.
नामांतर लढ्यातील तमाम वीरांना आणि राजकिय पटलावर समतेचा, न्यायाचा हा लढा सर्व विरोधांना झुगारून यशस्वी करणाऱ्या सर्वच विचारवंतांना, नेत्यांना मानाचा जय भीम…
– डॉ. जितेंद्र आव्हाड