अमेरिकेच्या साम्राज्यवादी राजकारणाला तब्बल सहा दशकांहून अधिक काळ यशस्वी आणि कडवं आव्हान देणाऱ्या आणि क्युबन क्रांतीचे जनक फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन झाल्याची बातमी जेव्हा इंटरनेटवरून कळाली तेव्हा आधी विश्वासच बसला नाही. कारण याआधीही फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाच्या अनेकदा अफवा उडाल्या होत्या. ऑगस्ट 2011 मध्ये फिडेल इज डेड नावानं ई मेल आले होते. तर 2012 आणि नंतर 2104 मध्येही अशाच अफवा इंटरनेट हॉक्समुळे सातत्याने येत होत्या. पण आज आलेली बातमी अफवा नव्हती. आज खऱ्या अर्थानं वीसाव्या शतकाची अखेर झाली. क्रांतिच्या सूर्यानं माझ्यासारख्या 70 च्या दशकात जन्माला आलेल्यांचं तारूण्य श्रीमंत करणाऱ्या या क्रांतिकारकाचा सूर्य अखेर अस्ताला गेला.
एका बाजूला अख्ख्या जगानं अमेरिकेसमोर भीतीपोटी पायघड्या पसरलेल्या असताना फक्त स्वतःच्या हिमतीच्या आणि स्वाभिमानाच्या जोरावर अमेरिकेला साठ वर्षे झुंजवत ठेवलं. भांडवलशाही,नवउदारमतवाद, चंगळवाद या सर्व तत्वांना कट्टर विरोध करून साम्यवादी भूमिका जगासमोर ठेवणाऱ्या कॅस्ट्रोचं आयुष्य अतिशय रोमांचकारी घटनांनी भरलेलं होते.
फिडेल कॅस्ट्रोचा जन्म क्यूबातील एका सधन शेतकरी आणि त्याच्या मोलकरणी सोबत आलेल्या संबंधांतून झाला. जन्माला आलेल्या घरात जन्मजात श्रीमंती असल्याने फिडेलचं बालपण तसं रम्य होतं. कसलीच कमी नव्हती. पण जसंजसं वय वाढत गेली, समज येत गेली तसंतसं आपल्या आजुबाजूच्या जगात चालणाऱ्या विषमतेनं त्याच्या मनाला टोचायला सुरूवात केली. आपण जगत असलेलो जग आणि दिनदुबळ्यांचं विश्व यात असलेलं कमालीचं अतंर त्याच्या काळजाचा ठाव घेऊ लागली. यातूनच फिडेलचा मार्क्सवादी- लेनिनवादी बनण्याचा प्रवास सुरू झाला. रोमन कॅथलिक स्कूल मधून शिक्षण घेतलेल्या कॅस्ट्रोनं वकिली आणि समाजशास्त्राच्या पदव्याही संपादन केल्या. त्याचं वाचन अफाट होतं. त्याला जेवणाची प्रचंड आवड. नानाविध प्रकारचे पक्वान त्याला खाऊन पाहण्याची हौस असायची. त्याला सिगारही प्रचंड आवडायची. त्याच्या सिगार पकडण्याच्या पद्धतीतून त्याचा आवेश दिसून यायचा. देव आनंदचं गाणं, त्यातील देव आनंदचं सैनिकी पोशाखात सिगरेट शिलगावत मैं जिंदगीका साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया.. ह्या गाण्यातील शब्द फिडेलच्या जीवनशैलीशी अत्यंत मिळतेजुळते होते. कारण क्यूबात क्रांती घडली 1959 साली आणि देव आनंदचा हम दोनो आला 1961ला. कालांतरानं क्यूबा हा सिगारसाठी अख्ख्या जगात प्रसिद्ध झाला.
सॅन्टीऍगो येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून २६ जुलै १९५३ रोजी संघर्षाला सुरूवात केली. फिडेलने लष्करी तळ काबीज करण्यासाठी सर्व तयारी केली़. त्यानं बंडखोर माणसं गोळा केली. युद्धनीती तयार केली. लष्करी तळाजवळच शस्त्रसाठा जमवला़. आणि ठरल्याप्रमाणे तळावर हल्ला सुद्धा केला पण तो फसला.
या हल्ल्यानंतर फिडेल आणि त्याचा भाऊ राऊल यांना तुरुंगात डांबण्यात आलं. दोन वर्षांनंतर सुटका झाली. कॅस्ट्रोला माघार घ्यावी लागली़ त्यानंतर जीव वाचवत त्याला क्युबाबाहेर फरार व्हावे लागल़े तरीही जिद्द न हरता त्याने पुन्हा कंबर कसली़.
नंतर ते दोघे पुढे मॅक्सिकोमध्ये गेले आणि तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि लष्करासह ते पुन्हा क्युबामध्ये दाखल झाले. त्यातील बहुतांशी जणांना एक तर ठार केले नाही तर अटक केले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला.
१९५६ साली आपल्या सोबतच्या शंभेरक साथीदारांसह फिडेल क्यूबाच्या समुद्रकिनाऱ्यावर उतरला. पण लष्कराने केलेल्या हल्ल्यात त्याचे सारे साथीदार पुन्हा एकदा ठार करण्यात आले. यावेळेस फिडेल, त्याचा भाऊ राऊल आणि त्याचा जोडीदार चे गव्हेरा मात्र निसटून जाण्यात यशस्वी झाले. पण हारे मानेल तो फिडेल कसला?
त्यानं पुन्हा एकदा प्रय़त्नांची शर्थ केली. क्यूबामधील कष्टकऱ्यांच्या लहान मोठ्या सभा घेत त्यानं प्रबोधन सुरू केलं. पुढच्या तीन वर्षांत त्यांनं लोकांचा पाठींबा आणि मुबलक शस्त्रं जमवली. विद्राही तरूणांची भली मोठी फौज त्यानं आपल्या गाठीशी बांधून घेतली. आणि अखेर 1959 साली क्यूबन हुकुमशहा बटिस्टाची राजवट उलथवून फिडेलने क्रांती घडवून आणली. आणि तो स्वतः क्यूबाच्या सत्तासनावर आरूढ झाला. लगोलग त्यानं अमेरिकन भांडवलदारांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व उद्योगांचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला ते ही कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न देता. आणि तिथूनच फिडेल आणि अमेरिकेतल्या सत्तासंघर्षाला सुरूवात झाली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल आयसेनहॉवर यांनी संतापून त्या वेळी क्युबावर विविध आर्थिक निर्बंध घातले एवढेच नव्हे तर क्यूबाशी असलेले राजकीय संबंधही तोडून टाकले होते. पण फिडेल बधला नाही. त्यानं आपला लढा आणि कणखर बाणा कायम ठेवला. डिप्लोमसीच्या राजकारणातही फिडेल अगदी वरचढ निघाला. त्याने रशियाशी मैत्री करार करून केलेल्या अणुकरारानंतर अमेरिकेने क्यूबासोबतच्या सर्वच प्रकारच्या व्यवहारांना थांबवलं. त्यानंतर तब्बल बत्तीस वर्षे क्यूबाचे रशियासोबत मैत्रीपूर्ण संबंध होते.
फिडेलचे भारताशी सुद्धा नेहरू काळापासून नेहमीच मधुर संबंध राहीले आहेत. नेहरू गांधी घराण्याशी त्याचे घरोब्याचे नाते होते. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि फिडेल यांचे भाऊ बहिणीचे नाते होते.
खरं तर भारताच्या लूक इस्ट पॉलिसी संदर्भात फिडेलसोबतचे संबंध खूप महत्त्वाचे होते. एकदा १९८३ साली नाम NAM च्या बैठकी निमित्त फिडेलचे भारतात येणं झालं. तेव्हा पोडियमजवळ इंदिरा गांधीशी भेट घेताना फिडेलनं हस्तांदोलन न करता इंदिराजींना कवेत घेतले. पारंपारिक पद्धतीनं राजकारणाकडे पाहणाऱ्यांनी या घटनेकडे भुवया उंचावून पाहील्या. पण ते दोन्ही पंतप्रधान काळाच्या खुप पुढचे होते. इंदिराची फिडेल समोर अगदीच उंचीनं कमी होत्या. पण ती भेट आजही ‘फिडेल्स बेअर हग’ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र ते संबंध कळायला आपल्याला आज उजाडावा लागला आहे. फिडेलला भारतातील राजकारणाविषयी प्रचंड आपुलकी होती. भारताशी त्यांचे विशेष नाते होते. इंदिरा गांधींना त्यांच्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल फिडेल कॅस्ट्रोंनी आधीच सावध केले होते तसेच प. बंगालमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून कम्युनिस्ट सरकार स्थापन करण्याच्या ज्योती बसूंच्या कामगिरीने कॅस्ट्रो भारावून गेले होते.80 च्या दशकात जेव्हा फिडेल भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा भारतातील डाव्या संघटनांनी फिडेलचे जोरदार स्वागत केले होते. भारतातील सामान्य नागरिकांनी तेव्हा यांकी हा शब्द पहिल्यांदाच ऐकला असावा कदाचित. यांकी म्हणजे अमेरिकन. कारण फिडेल अमेरिकनांना यांकी बोलायचा. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने कॅस्ट्रोंना ठार मारण्याचे तब्बल सहाशे प्रयत्न केले होते. त्याच्या सिगारमध्ये विस्फोटकं मिसळली. कॉफी, जेवणात विष मिळवलं, त्याच्या हत्या करण्याचे अनेक कट रचले गेले. पण फिडेल या सर्व कटांना शह देत अमेरिकेला पुरून उरला.
त्यानंतर अमेरीकेला आव्हान देणारे अनेक राष्ट्र व नेते निर्माण झाले. आणि त्यामध्ये प्रामुख्याने सद्दाम हुसेनचे नाव देखिल घेता येईल.
फिडेल कॅस्ट्रो क्युबन कम्युनिस्ट पार्टीचा पहिला सचिव. 1959 सालच्या फेब्रुवारी महिन्यात क्यूबाच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर तब्बल अठरा वर्षे म्हणजे डिसेंबर 1976 पर्यंत विराजमान होता. 1977 पासून फिडेल मग राष्ट्रपती म्हणून कामकाज पाहू लागला. अगदी 2006 पर्यंत फिडेल राजकिय आयुष्यात पूर्णकाळ सक्रिय होता. जुलै 2006 मध्ये मात्र आपला भाऊ राऊल कॅस्ट्रो याला पुढे करत सत्तेची सुत्रं त्याच्या हाती सोपवली. आणि फेब्रुवारी 2008 साली प्रकृतीचं कारण पुढे करत फिडेलनं राष्ट्रपतीपदाचाही राजीनामा दिला. नंतर फिडेलचं सामाजिक आयुष्यात वावरणं जवळपास नाहीच्या बरोबरच झालं. कोणत्याही देशाच्या प्रमुखपदी एवढा काळ अधिराज्य गाजवणारा आणि त्याहून मोठं म्हणजे देशातील जनतेच्या मनावर एवढी वर्षे गारूड करणारा फिडेल हा एकमेवाद्वितीयच. दरम्यानच्या काळात अमेरिकेत तब्बल नऊ राष्ट्राध्यक्ष येऊन गेले. प्रत्येकाने फिडेलला नामोहरम करण्याचा आपापल्या परिने प्रयत्न केला. पण फिडेल त्या सर्वांना पुरून उरला. अगदी मार्च 2016 मध्ये ओबामांच्या रुपाने पहिल्यांदाच अमेरिकी राष्ट्राध्यक्षानं क्यूबन जमीनीवर पाय ठेवला खरा. पण ओबामांचा तो दौराही निष्फळ ठरला. कारण फिडेलनं ओबांमांना भेट दिलीच नाही.
नव्वद वर्षांचा चालता बोलता थरारक असा क्रांतीकारी इतिहास आज अखेर विसावला. पण त्यांनं रोवलेली क्रांतीची बीजं ही नेहमी प्रेरणा देणारी आहेत. फिडेल हा केवळ एक व्यक्ती नव्हता तो विचार होता, त्यानं जगाला शिकवलं की क्रांती ही फक्त विचार आणि चर्चांत नसते त्याला कृतीची योग्य जोड द्यावीच लागते. या लढवय्याला मानाचा लाल सलाम…
– डॉ. जितेंद्र आव्हाड
मी क्रांतीची सुरुवात 82 जणांबरोबर केली. आता मला ती पुन्हा करायची असेल तर ती मी फक्त अत्यंत विश्वासाने 10-15 जणांना सोबत घेऊनच करीन. कारण, तुमच्या बरोबर किती जण आहेत हे महत्वाचे नसून तुमचा आत्मविश्वास आणि व्हिव्यूरचना यालाच जास्त महत्व आहे.
-फिडेल कॅस्ट्रो