नमस्कार,
तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या कारकिर्दीची पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत. तेव्हा ह्या पाच वर्षांवर थोडे बोलायचं आहे.
मी आमदार बनलो तेव्हा ‘सर्व आमदार सारखेच असतात’ असं लोक म्हणत असत. पण मी आव्हान स्विकारलं. निश्चय केला. माझ्या मतदारसंघाने निवडलेला आमदार इतर चारचौघांपेक्षा निराळा असेल… तो चेहऱ्यापेक्षा नावाने जास्त ओळखला जाईल. माझ्या मतदारसंघातील राजकारणाचा चेहरा बदलण्यासाठी आधी अभ्यासूपणा वाढवला. मुंबई विद्यापीठात “महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक चळवळी” प्रबंधाबद्दल पी. एच. डी. मिळवली. फक्त डॉक्टर पद मिरवण्यासाठी नाही तर आपल्या मतदारसंघाच्या पाठीशी प्रबंधातून मिळालेलं ज्ञान उभं करण्यासाठी. सामाजिक चळवळीची ताकद किती असते? क्लस्टर डेवलपमेंटचा मुद्दा सर्वात प्रथम मांडून मी गप्प बसलो नाही. त्याला चळवळीचं रूप दिलं. आपलंच सरकार सत्तेवर होतं. तरीही लाखोंचा मोर्चा मंत्रालयावर नेला. इच्छाशक्ती आणि जनशक्ती एकत्र आली आणि दस्तुरखुद्द मुख्यमंत्रांनी कौतुक केलं.
तसा मी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला. तुमच्या आशीर्वादाने आमदार झालो… आणि माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब ह्यांनी तर थेट महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली… आणि नंतर महाराष्ट्राचा वैद्यकीय शिक्षणमंत्री.
सगळं काही तुमच्या आशीर्वादाने झालंय ह्याची मला पूर्ण जाणीव आहे.… तुम्ही देता बळ माझ्या पंखांना आकाशात उडण्याचं … काही कार्यकर्ते विचारतात, ‘साहेब, दिवसरात्र, अष्टोप्रहर हिरीरीने काम करण्याची उर्जा तुमच्यात येते कुठून? मी त्यांना गाडीत बसवतो आणि कळवा फिरवून आणतो ,,, ह्या माझ्या बंधूभगिनींच्या डोळ्यांत पाहिलं ना की जाणवतं ह्यांचा माझ्यावर रक्ताच्या माणसांपेक्षा जास्त विश्वास आहे…
त्यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे कारण ते समजतात माझे खांदे त्यासाठी सक्षम आहेत… त्यांना वाटतं की मी मांडू शकतो सभागृहात त्यांच्या मागण्या ठामपणे, वेळ प्रसंगी न्याय मागण्यासाठी त्याच सभागृहात स्वस्थ न बसता मी आक्रोश करू शकतो, करू शकतो आंदोलन मी जातीधर्माच्या पलीकडे पाहून माणसाला ‘माणूस’ म्हणून जगवण्यासाठी. आणि मग अशावेळी थकून भागून, खांदे पाडून कसं चालेल … अहोरात्र केलंच पाहिजे एवढं काम आहे मतदारसंघात,,,
दिवसरात्र एक केलेत तेव्हा कुठे आता दिसतंय ते चित्र बदललंय …
कॅम्पाकोलाचे हाल बघून वाटतं आपल्याला त्यावेळेस सुबुद्धी सुचली आणि रेलरोको वगैरे केला तेव्हा कुठे त्या ३५००० झोपडपट्टीवासीयांकडे लोकांनी करुणेच्या नजरेतून पाहिलं ,, कळवा विभागाला सापत्न वागणूक देण्याऱ्या वीज विभागाला ‘झीरो लोडशेडींग’ राबवण्यास भाग पाडलं. खड्ड्यांच्या रस्त्याचं स्टेशन असं कळवा स्टेशनकडे पाहून हसणारे आता त्याच सुसज्ज कळवा स्टेशनकडे पाहून तोंडात बोटं घालतात… रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी अविरत पाठपुरावा… पाठपुरावा कसला मी त्यांचा पिच्छा पुरवला असं म्हणा’, तेव्हा रेल्वे रूळांखालच्या विटाव्याच्या बोगद्याचं विस्तारीकरण झालंय आणि लगोलग रस्त्यांचं नुतनीकरणही करून घेतलं. अन्यथा तिथला वाहतुकीचा खोळंबा सुटला नसता. आता हा ठाणे स्टेशनपासून विटावा स्कायवॉक होऊ द्यात.… ४ मिनिटात माणूस ठाणे स्टेशनपासून कळव्यात पोहोचतो की नाही ते बघा. कळव्यात ७२ एकरच्या भूखंडावर सर्व शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी येणार, कळव्यात आंतरराष्ट्रीय विद्यापीठ येणार.… पारसिक येथील डोंगरावर २५ एकर जागेमध्ये उद्यान उभारणार … आपण सगळे मिळून कळवा नंबर वन करूयात.… महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा उभारणी असो, आंबेडकर भवन असो, नाट्यगृह असो, ज्येष्ठ नागरिक भवन असो किंवा नवीन कळवा खाडी पूल असो तुमची कामं करताना जात-धर्म-पंथ असले भेद पाळले नाहीत कधी . शासनाच्या जमिनीवरील घरे व इमारती पाडा असा निर्णय आल्यानंतर मा. उच्च न्यायालयात जाऊन मी त्या निर्णयाविरोधात स्थगिती आणल्यामुळे आजरोजी विटावा, वाघोबा नगर, आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पौंडपाडा या परिसरातील नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील लाखो कुटुंबांचे घर – संसार अबाधित रहिले. कळवा-मुंब्रावासियांना इमारत कोसळण्याचं दुःखं अनेकवेळा सोसावं लागलं आहे. एका इमारत दुर्घटनेतील पीडितांना वाचवू पाहणाऱ्या तरुणाचा हात पडझडीमध्ये जखमी झाला होता. हात गमावण्याची पाळी त्याच्यावर आली. मी विचार केला अत्याधुनिक वैद्यकशास्त्र उपलब्ध आहे. मी ह्या तरुणाला अपंग होऊ देणार नाही.
सारी शक्ती पणाला लावली आणि त्याचा हात पूर्ववत केला. त्या हाताने माझं कार्य धष्टपुष्ट बनवलं. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट… पावसाळ्याआधी नालेसफाई न झाल्यामुळे पाणी तुंबतं आणि लोकांच्या घरात घुसतं. म्हणून ते काम समाधानकारक झालं की नाही हे स्वतः जाऊन पाहिलं आणि काम नीट झालं नसल्याचं पाहून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला. पाणी नळातून यावं, कोणाच्याही दारातून येऊ नये…
शाळेत असताना मला प्रश्न पडायचा की एक गणित सोडवून झाल्यावर दुसरं गणित उभं राहतं, ते सोडवल्यावर तिसरं उभं राहतं. आज त्याचा अर्थ कळतोय की प्रश्न कधीच सुटत नसतात. तुमच्यासमोर दोन पर्याय असतात. एकतर एकच प्रश्न कायमचा समोर ठेवा आणि तिथेच थांबा. दुसरा पर्याय म्हणजे एक प्रश्न सुटला की पुन्हा नव्याने समोर आलेला नवा प्रश्न सोडवायला सुरुवात करा. मी दुसरा पर्याय स्वीकारला, समस्या सोडवत पुढे निघण्याचा मला आता नाद लागला आहे.
आमदारपदाला धर्म मानून मी प्रत्येक धर्म-जातींमध्ये जातो, काम करतो. माझं पद महत्वाचे नाही, नाव महत्वाचे नाही… महत्व द्या माझ्या कामाला. मी आश्वासनांची खैरात केली नाही, करणार नाही. आधी करतो आणि मग बोलतो. म्हणून मी केलेल्या कामावरून जरूर नजर फिरवा. कारण मी ते तुमच्या आशीर्वादाने करत आलो आहे आणि करत राहीन. मी आधी खेळाडू आहे आणि मग आमदार. खरं म्हणजे कोणतेही पद मिळालं तरी मी ऍथलिटच आहे. दिसला अडथळा की पार करून पुढे निघायचं. त्यामुळे एक आव्हान संपलं की माझं लक्ष दुसऱ्या आव्हानाकडे जातं. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती हा माझा देव आहे. मानवता हा माझा धर्म आहे. मी कोणाचाही संसार उघड्यावर पडू दिला नाही, देणार नाही. कोणाच्या घरात अंधार असलेला चालणार नाही. अनेक स्त्रिया नोकरी करतात. काहींना पाळणाघरात ठेवलेल्या बाळांपर्यंत वेळेवर पोहोचायचे असतं. ‘घार उडते आकाशी, चित्त पिल्लांपाशी’… तिला पिल्लांपर्यंत झटपट पोहोचण्यासाठी खड्डेमुक्त, ट्रॅफिकमुक्त रस्ते देणे ही माझी जबाबदारी आहे. असं म्हणतात, नेते पाच वर्ष झोप घेतात! इतरांचं जाऊ द्या… मी झोप नाही, ‘भरारी’ घेतली. विविध पदांच्या उंचीवर पोहोचलो, पण ‘घार उडते आकाशी”… अशीच माझी अवस्था राहिली. कुठेही असलो तरी माझं चित्त मतदारसंघातील सामान्य लोकांपाशीच असतं.
तुमचे पंख आहेत सोबती, हीच माझी सर्वात मोठी संपत्ती !!!
मला का वाटेल भवितव्याची भीती.